श्री वेताळ महारुद्र हे देवस्थान आपण डिचोली तालुक्याच्या मुळगांव नावाच्या गावांत स्थापित असलेले पाहातो, ते एकेकाळी गोमंतकांतच बारदेश तालुक्याच्या शिरोडे गावांत,
आजच्या कालांत सेरुला म्हणून ओळखतों त्या गावांत, मूळ स्थापिलेले होते. कांही काळानंतर हे देवस्थान डिचोली तालुक्याच्या अडवालपाल या गावांत / इ. स. 1566 पूर्वी
आणि तेथून हलवून सध्याच्या मुळगांव गावांत आणून स्थापन केले.
|
गोमंतकांत इसवी सनाच्या सोळाच्या शतकांत तिसवाडी सासष्टी, आणि बारदेश या तीनही तालुक्यांत हिंदू धर्मीयांची देवालये आणि श्रद्धास्थाने होती. प्रत्येक देवस्थानचे मूळ कुळावी
आणि त्यांचे वंशज जसे गोमांतकांत स्थिरस्थावर होऊन कायम वास्तव्य करुन आहेत, त्याचप्रमाणे बहुसंख्य कुळावी गोमंतकाबाहेर, आजच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतच नव्हे,
तर सबंध भारतभर आहेत. असे असूनही त्या असंख्य लोकांचे गोमांतक भूमीकडे अतूट नाते, प्रेमपाश अव्याहतपणे टिकून राहिले. त्या लोकांची कुलदैवते आणि त्यांची देवालयें
टिकून आहेत. या प्रत्येक देवस्थानचे कुळावी वारंवार गोमांतकांत येऊन, आपल्या कुलदैवतांचे दर्शन घेऊन, त्यांची यथाशक्ती सेवा करण्यासाठी, देवधर्म कृत्यें करून किंवा करवून
घेण्यासाठी आपआपल्या इच्छेनुसार सढळ हातानें पैसे खर्चितात. आपल्या देवस्थानच्या ऐतिहासिक आणि अत्यावश्यक माहितीचे छोटेसे तरी सचित्र पुस्तक आपल्या या लोकांना संग्रही
ठेवावें, अशी इच्छा असते. गोमांतकांत बहुसंख्य देवस्थानांत, अवघीं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकींच देवस्थानें वगळल्यास, आपल्या कुलदैवताच्या देवस्थानची आरंभी स्थापना कोठें,
कोणत्या गांवीं, कोणत्या जागीं होती, तेथें असताना प्रमुख दैवत कोण, पंचायतन सहपरिवार दैवतें कोणतीं, त्या देवस्थानचें स्थलांतर कोणत्या कालांत, कोणी, कोठें केलें, मूळ
जागेंत असतांना त्या देवस्थानाच्या स्वत:च्या मालकी हक्काच्या जमिनी, देवस्थान संस्थापक, त्यांचे गोत्र, त्यांची उपनांवे, देवस्थानांत प्रतिवार्षिक महत्वाचे नियमित उत्सव साजरे
केव्हां होतात, प्रसादकौल आपल्या देवस्थानांत घेण्याची वहिवाट आहे किंवा नाहीं, अशी माहिती आपणास आपल्या देवस्थानापुरती तरी मिळावी. या एकमेव सद्हेतूने संक्षिप्त रुपांत
येथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
|