भरतखंडात मोठमोठे सम्राट चक्रवर्ती होऊन गेले. त्यांचीं साम्राज्यें नष्ट झालीं, लुप्त झालीं, तथापि, सर्वांनीं बांधलेलीं देवालयें आजवर टिकलीं आहेत.
गोमांतकांत इसवी सनाच्या सोळाव्या शतकांत, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या बळजबरी अमानुष धोरणामुळें तिसवाडी, सासष्टी आणि बारदेस या तालुक्यांतील देवस्थानांचें
स्थलांतर सरहद्दी बाहेरच्या परकीय राज्यांत, संबंधित देवालयांच्या कुळावी महाजन भक्तांनी केलें, आणि तेथें आपआपली दैवतें पुनर्स्थापित केली.
जेथें जेथें तीं दैवतें पुनर्स्थापित केलीं, तेथें तेथे, आमच्या पुण्यपुरुष पूर्वजांनी सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करून जी नवीन देवालयें बांधिलीं, तीं आजवर टिकली आहेत, आणि तीं त्याकालच्या
भारतीय आणि त्यांतल्या त्यांत गोमंतकाच्या संस्कृतीची गुणगाथा गात आहेत. एवढी भव्य आकर्षक आणि नयनरम्य देवालये त्या कालीं बांधण्यांत आलीं, म्हणूनच आपल्या संस्कृतीची
महानता समजण्याची एक उत्तम संधी आपल्याला लाभली. प्रत्येक पिढी आपल्या संस्कृतीची मशाल पुढच्या पिढीच्या स्वाधीन करून जात असते, आणि ही मशाल तेवत ठेवणे हे
प्रत्येक पिढीचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून आपले वर्तन करणें योग्य ठरेल.
|