Calendar
About Vetoba  |  Utsava Patrika  |  Karyakram Patrika  |  Donations  |  Mahajan  |  Contact Us  | 
 Welcome

About Us >> गोमांतकांतील सोळाव्या शतकांतील राजकीय परिस्थिती Back
श्री वेताळ महारुद्र शिरोडकर देवस्थान
गोमांतकांतील सोळाव्या शतकांतील राजकीय परिस्थिती

गोमांतकांतील दैवतांचे स्थलांतर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळेंच झालें आहे. इसवी सन 1510 साली पोर्तुगीज कॅथलिक धर्माच्या लोकांनी गोमांतकांत जलमार्गाने प्रवेश केला आणि गोवा बेट ऊर्फ तीसवाडी आदिलखानाकडून जिंकून घेतला. ह्या कामी तत्कालीन गोवेकर हिंदूनी त्यास सहाय्य केले. आफोंस दे आल्बुकेर्कच्या कारकीर्दीत हिंदूंना जबाबदारीच्या अधिकार पदावर पोर्तुगीजांनीं नेमलें होते. आल्बुकेर्कच्यानंतर देखील कांहीकाळ गोव्यात मोठमोठ्या हुद्यांवर गोवेंकर हिंदूच होतें. ह्यांपैकी सर ठाणेदार कृष्ण शेणवीं, चोडणेचे लखू नाईक, थोरल्या वेवऱ्यांचे गोपू शेणवी, गोवे शहरातील अनू शेणवी, माने कृष्ण शेणव्यांचा मुलगा दादाजी शेणवीं, ही नांवे पोर्तुगीजांच्या इतिहासांत ठळकपणे आढळतात. सन 1547 साली विजापूरकरांची अंक्रूज व साष्ट या तालुक्यांवर स्वारी झाली, त्यावेळीं दादाजी शेणव्यानें दोन हजार पायदळाचें नेतृत्व करून फिरंग्यांच्या बाजूनें शत्रूशीं फोंडें येथे मुकाबला केेला होता. दादाजीस तत्कालीन पोर्तुगीज कागदपत्रांत गोवेंकर हिंदूच्या पायदळाचा कॅप्टन अशा अर्थाचें वाक्य पोर्तुगीज भाषेंत "कापितांव दे कोंपाजीय दे पेयोंइस कानारींस'' असे म्हटलेलें आहे. त्या काली "कानारी'' ह्या नांवानें पोर्तुगीज लोक गोवेंकरास ओळखत. दादाजीच्या त्या पायदळात हिंदू लोक होते. कोणतेही राज्यकर्ते दुसऱ्याचे राज्य काबीज केल्यानंतर काबीज केलेल्या राज्यांतील जनतेस प्रारंभी खुषींत, आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आफोंस दे आल्बुकेर्कनें गोवा बेटांतील त्या प्रजेस धर्मस्वातंत्र तर दिलेंच शिवाय जी प्रजा पूर्वीच्या राज्यकर्त्यास आदिलखानास जे कर देत असे त्या करांतही सूट दिली. त्यानंतर, पोर्तुूगालहून गोव्यांत एक ख्रिस्तीधर्मीय धर्मगुरु बिशप दूमि नांवाचा आला. त्यानें ता. 22 जानेवारी 1522 रोजी गोव्याहून एक पत्र पोर्तुगालच्या राजेसाहेबांस पाठविलें. त्या पत्रांत त्यानें असें राजास कळविलेें कीं, ""आपल्या या बेटांतील देवालयें पाडून त्या ठिकाणी चर्चे उभारली गेल्यास परमेश्वराची सेवा होईल. ज्या इसमास त्या बेटांत रहावयाचें असेल, त्यानें खिस्ती होऊन रहावें व असे केल्याने त्याला आपल्या येथील जमिनी व घरें मिळतील. पण जो ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास राजी नाहीं, त्यानें हें बेट सोडून जावें.''त्यानुसार बळजबरीनें ख्रिस्तीकरणास प्रारंभ झाला, आणि गोवा बेटातील देवलयांचा विध्वंस करण्याचें अंमलांत येऊ लागले. हिंदू धर्मीयांचा आक्रोश सुरू झाला. वृद्ध ज्ञानी हिंदूनीं कांहीच सुगावा लागूं न देतां, रात्रीच्या काळोखांत, आपल्या जीवाचा धोका पत्करून प्रमुख देवतांच्या अधिष्ठित मूर्ती, ती जड एका मनुष्यानें सहजासहजी वाहून नेण्यासारखी नसल्यास, त्या प्रमुख दैवताऐवजी त्या दैवताचे कोणतेंही प्रतिक, जें त्या भयानक संकटप्रसंगी गुपचुप उचलून परराज्यांत पळवून नेणें शक्य होईल असें, लिंग, लहान पाषाणशिळा वगैरे घेऊन, परराज्यांत पळून जाणेचे ठरवून टाकले. यातही हजार विघ्ने, असें करणारा इसम वाटेंत त्या ख्रिस्तीकरणारांस सापडला, त्या इसमाच्या हातांतील दैवत किंवा त्याचं प्रतिक ते लोक काढून घेऊन तेथेच मोडून फोडून नष्ट करणार. त्याचबरोबर ती मूर्ति, प्रतिक पळविणाऱ्या इसमास तेथेंच कंठस्नान घातले जाई. अशा परिस्थितीत आपली दैवते घेऊन जे लोक शेजारच्या राज्यांत पळून गेलें आणि जेथें जेथें त्यांस आश्रय मिळाला, तेथें त्यांनी ती दैवते ठेवून, दैनंदिन पूजाअर्चा चालू ठेवून, देवालयें बांधून स्थिरस्थावर होण्याचे प्रयत्न त्यांचेकडून केले गेलें. आपलें घरदार, मुले बाळें, बायको या सर्वांचे माया, मोहपाश निव्वळ आपली दैवते सुरक्षित रहावी यासाठी तोडले, धनधान्य, दागदागिने, जमिनी सर्व इस्टेटीवर कायमची तिलांजली एका क्षणात दिली. त्या दैवतांचे, आजच्या कालांत त्या पुण्यपुरूष पूर्वजांचे वंशज आम्ही, म्हणून कुळावी महाजन नांवानें अभिमानाने मिरवित आहोंत. त्या काळी आपलें दैवत जपण्यासाठी प्राण पणास लावून, जड पाषाणी द्वारपाला सारख्या मूर्ती या महाजनांनी तेथून हालवून, त्यांची व्यवस्था विहिरी तलाव, ओढे, नदी अशा ठिकाणी पाण्यांत टाकून केली आणि जेथें जवळ पाण्याची सोय नव्हती, तेथें जमिनीत पुरुन केली. याचे स्पष्ट पुरावे म्हणजे नंतरच्या कालांत, विहिरी तलाव उपसल्यानंतर, त्या ठिकाणीं शेकडों मूर्ती सांपडल्या. त्यातील कांही मूर्ती सरकारने आपल्या म्युझियमांत ठेवल्या. कोणी पळवून दुसऱ्या राज्यांत गोव्याबाहेर नेल्या आणि काही परदेशांतही पोंचल्या, अद्यापही त्या मूर्ती सबंध चांगल्या स्थितीतं मिळतात किंवा त्या जमिनींतून बेसावधपणें काढताना त्याचा एखादा भाग छिन्न विच्छिन्न झाल्याचें दिसतें. असे पुरावे पुष्कळ देतां येतील. फ्रांसिस्कु पाइस त्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने सन 1595 सालीं "तोंबु' नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत असें सांगितलें आहे कीं, पोर्तुगालच्या राजाच्या आज्ञेनुसार गोवाा बेटांतील सर्व देवालयें इसवी सन 1540 ला पाडण्यांत आलीं. उल्लेखित "तोंबु' जरी पन्नास वर्षानंतर लिहिला गेला असला, तरी त्यांतील माहिती सरकारी कागदपत्रांवर आधारलेली आहे हें लक्षात ठेवलें पाहिजे. इ. सन 1540 सालापूर्वीही पोर्तुगीज अमदानींत गोवा बेटांतील कांही देवालयें जमीनदोस्त करण्यांत आली.
गोवा बेटांतींल हिंदूचीं सर्व देवालयें ता. 28 जून 1541 पूर्वी नष्ट करण्यांत आलीं. असा एका सरकारी लेखांत स्पष्ट उल्लेख आहे. शिवाय या लेखामध्यें म्हटलें आहे कीं, ""ह्या बेटांतील सर्व देवालयें मोडण्यांत आलीं असून तीं पुन्हा केव्हांच उभारण्यांत येणार नाहींत.'' (पहा :- तोंबु जेराल पृष्ट 70, डॉ. पिसुर्लेकर संपादित. डॉ. पिसुर्लेकर हे त्या पार्तुगीज कालीन आंर्किव्हु इस्तोरिकु खात्याचे डायरेक्टर होऊन गेले.) मेस्त्रि दियोगु आणि त्याचे सहकारी मिंगेल व्हाज व दोतोर पेरू फेर्नांदिस हे गोवा बेटांतील देवालयें व त्यांच्या महाजनांच्या पाठीस हात धुऊन लागले. त्यांनीं त्या लोकांमध्यें इतके वादविवाद आणि तंटेबखेडे उत्पन्न केलें कीं त्यास सीमाच उरली नाहीं. इ. सन 1540 सालापूर्वी गोवा बेटामध्यें फार थोड्या प्रमाणांत हिंदु बाटलेले होते. गोवा बेटांतून हिंदू इ. स. 1557 ते 1560 च्या सुमारास गव्हर्नर फ्रांसिस्कु बाऱ्हेतु व व्हिसरै दों कोंस्तांतीनु दे ब्रांगांस यांच्या कारकिर्दीत शेजारच्या आदिलशहाच्या प्रदेशांत तसेच कर्नाटक आणि मलबार येथील हिंदु राज्यांत जाऊन राहिले. शेजारीं आदिलशहाचें राज्य असलें तरी, तेथें हिंदूना बरेंच धर्मस्वातंत्र्य होतें. कारण, तेथें सर्व देसाई हिंदु होते आणि गांवकारही हिंदूच होते. उपरोक्त व्हिसरै दों कोस्तांतीनु दे ब्रागांस याच्यानंतर अधिकारावर कोंदिदे रेहोंद (1661-1664) आणि त्यानंतर दों आंतांव दे नोरोंज (1664-1668) हे आले. त्यांनी फर्मान काढून गोवा बेटातून पळून गेलेल्या हिंदूंस परत गोव्यांत बोलाविलें. सर्व प्रकारचें अभय दिलें. पण, पळून गेलेल्यांपैकी फार थोडे लोक गोव्यांत परतले. गोवें शहराच्या ऱ्हासाचे एक कारण, इंक्विंझीशन होय, गोवा बेटांत इ.स. 1560 मध्यें इंक्विझीशन स्थापन केलें होतें आणि तें 16 जून 1812 च्या पोर्तुगालच्या राजेसाहेबांच्या हुकुमशाहीने कायमचें नष्ट केलें गेलें. इंक्विझीशन धार्मिक जाचामुळें गोव्यांतील बहुसंख्य हिंदू व्यापारी पळून गेले आणि त्यामुळेच गोवें शहराचा व्यापार बसला. त्या कालीं येथील कस्टमचेें उत्पन्न केवळ, सहा हजार "दुकादु' होतें. पूर्वी हिंदु लोक गोवें शहरांत व्यापार करीत त्या वेळीं हेंच उत्पन्न एकशें वीस हजार ते एकशें पन्नास हजार म्हणजे वीस ते पंचवीस पट अधिक असे. नामांकित इतिहासकार श्री. पद्मनाभ मेनन यांनीही गोव्याच्या इंक्विझीशन मुळें कोकणी ब्राह्मण मलबार मध्यें आले असें म्हटलें आहे. पोर्तुगीजांनी ख्रिस्तीकरणाचा प्रारंभ केव्हां, कसा, कोठें केला होता तें समजल्याशिवाय तत्कालीन बारदेश तालुक्यांतील शिरोडें गावांतील देवालयांची माहिती लक्षांत येणे कठीण आहे. गोवा बेटानंतर हे खिस्तीकरण सासष्टी आणि बारदेश तालुक्यांकडे वळले. इब्राहिम आदिलखानानें आपणाकडे असलेले प्रदेश सासष्टी आणि बारदेस कृष्ण शेणवीं याच्या मध्यस्थीनें पोर्तुगीजांस इ. सन्‌ 1543 सालीं बहाल केले. झेझुइट पंथाच्या लोकांनी आपल्या धर्मप्रसारार्थ सासष्टीच्या कुठ्ठाळ गावांत ता. 1 में 1560 राजी श्रीमंगेश देवालय आपल्या कबजांत घेऊन, ख्रिस्तीकरणाचा आरंभ केला. तेथें पोचल्यानंतर त्यांस त्या देवालयातील देव अन्य राज्यांत नेऊन पोचविला होता हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी देवालयाची इमारत ख्रिस्ती धर्मीयांचे चर्च स्थापन करण्यासाठी व्हॉइसरायकडे मागितली. त्या देवालयाच्या मालकीच्या उत्पन्नाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी त्या चर्चेसाठी बहाल झाल्या! तत्कालीन गोव्याच्या व्हॉइसरायाने रायतूरचा किल्लेदार दियागु फेर्नांदिस यास या बाबतींत काय करावयाचे ते लिहून कळविले. ता. 8 मार्च 1567 रोजी कॅप्टन दियोगु फेर्नांदिस कांही लोकांस घेऊन वेरणें गांवात गेला. त्यांनतर तो कॅप्टन ता. 17 मार्च 1567 रोजी सांखवाळ गावांत. 5 एप्रिल रोजी सावर्डे गांवात, त्यानंतर कुंकळळी, चिकोळ, चिंचाणे, केलोशी अशा प्रत्येक गांवात गेला. तेथे प्रत्येक ठिकाणी विध्वंसक कार्य केले. त्या कॅप्टन दियागु फेर्नांदिस याने आपल्या ता. 17 मार्च 1567 च्या पत्रात लिहिले आहे की, ""झेझुइटांच्या मठांतील पाद्र्यांस कळवा की सासष्टींतील देवालयांपैकी तीन चतुर्थांश देवालये नष्ट करण्यात आली आहेत.'' ता. 5 एप्रिल पर्यंत सासष्टींतील अठ्ठावन्न गावांतील देवालये तेथील मूर्तींसह मोडून टाकली. मुरगांवची मशीदही जमीनदोस्त करण्यांत आली. देवालये. जमीनदोस्त करून आपण आपलें नांव अजरामर करणार असें कॅप्टन दियोगु फेर्नांदिस म्हणत असें. त्याच्या थडग्यावर अशाच अर्थाचा एक लेख कोरलेला होता. बारदेशमधील फ्रांसिस्कन पाद्र्यास हिंदूंची सर्व देवालयें इसवी सन 1567 मध्यें मोडून टाकली अशी माहिती (थळलज्ञळ ऊेर्लीाशपींर खपवळलर. तखख रिसश. 396) या महत्वाच्या ग्रंथात आहे. हा ग्रंथ इटलीच्या रोम शहरांत प्रसिद्ध झाला. देवालयांचा विध्वंस आणि ख्रिस्तीकरणाचीं अघोर कृत्यें हिंदु लोक मुकाट्यानें सहन करुन हात पांघरून स्वस्थ राहिले असतील असा कोणी तर्क करूं नये. त्यावेळचे हिंदु लोक आजच्या कालापेक्षां जास्त पराक्रमी, निस्वार्थी आणि अतुलनीय त्यागी वृत्तीचे होते. याचे नि:संदिग्ध पुरावे त्या ख्रिस्तीकरण बळजबरीने करणाऱ्यांनीच आपल्या गुप्त लिखाणांत नमूद केलेले पहावयास मिळतें. शिरोडे गांवातील देवालयांसंबंधित, "या गांवच्या तत्कालीन नागरिकांनी तेथील क्रॉस मोडून टाकलें म्हणून सरकारने त्या गावांतील देवालये उध्वस्त केली होती' अशी इतिहास दप्तरांत माहिती मिळते. शिरोडे गांवच्या हिंदूनी आपल्या गांवातील देवालये ख्रिस्तीकरण करणाऱ्या लोकांनी उध्वस्त करण्यापूर्वीच त्या गावांतील क्रॉस मोडून टाकले होते ही घटना फार बोलकी आहे. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत बारदेशाच्या बहुतेक जनतेचे ख्रिस्तीकरण झाले होते. व्हिसरै कोंदि दे सां व्हिसेंत यांच्या कारकीर्दीत इसवी सन 1667 त बारदेस मधील हिंदूंची यादी करून त्यातील चार हजार स्त्रीपुरूषांस ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्यांत आली आणि राहिलेल्या तीन हजार हिंदूंस व्हिसरैनें ता. 21 सप्टेंबर 1667 च्या जाहीरनाम्याद्वारें हद्दपारीची शिक्षा ठोठावली. हिंदू प्रजेच्या संसर्गामुळें ख्रिस्ती प्रजा बिघडते असें ह्या हद्दपारीचें एक कारण सदर जाहीर नाम्यांत दिले आहे. (पहा. तोंबु जेराल, पृष्ठ 184) आता प्राचीन कालीं बारदेस तालुक्याच्या शिरोडे गावांत हें देवस्थान असतांना तेथें कोणकोणती दैवते स्थापित होतीं तें समजून घेऊ. गोवा पुरातत्व खात्याच्या पोर्तुगीजकालीन ऐतिहासिक दप्तराच्या आधारे त्या खात्याच्या डायरेक्टर होऊन गेलेल्या इतिहासाचार्य कै. डॉ. पांडुरंगबाब सखाराम शेणवी पिसुर्लेकर यांनी पोर्तुंगीजांनी उध्वस्त केलेली बारदेशांतील देवालयाची जी यादी तयार केली त्या यादीत शिरोडें (डर्ळीीश्रर) गावांत जी दैवते होती त्यांचा तपशील खालीलप्रमाणें पहावयास मिळतो. ""वेताळ, नारायण, धाकटी वनदेवता, खळनाथ, व्हडली वनदेवता, सिद्धनाथ, म्हालकुमी, (महालक्ष्मी), ग्रामपुरूस, सोमनाथ वरी, काळपुरूस, खेत्रपाळ, सांतेरी, वारानाथ, मल्लनाथ, भरावती महाकाली, गोपश्वर. बारदेश तालुक्यांत ख्रिस्तीकरणाची चाहूल लागतांच वरील देवालयांच्या कुळाव्यांनी जी आपली दैवते स्थलांतर करुन अडवलपाल येथे जाऊन तेथें त्यांची स्थापना केली. पण त्यांच्या इच्छेप्रमाणें तेथील परिस्थिती त्यांना मानवली नसावी किंवा तेथेही काही अडचणी त्यांना भासल्या असाव्यात. म्हणून त्या कुळाव्यानी सतराव्या शतकांत तीं देवतें अडवालपालहून हलवून मुळगांव गावात आणून तेथें योग्य ती व्यवस्था करून स्थापित केलीं ती तेथें आजतागायत सुस्थितींत असल्याचे पहात आहोत. श्री वेताळ महारुद्र शिरोडकर हें प्रमुख दैवत असून त्या शिवाय (फिलियाईस) म्हणजे आनुवंशिक जीं दैवतें तेथे स्थापन केलीं दिसतात. श्री पुरूषोत्तम, श्री लक्ष्मेश्वर, श्री नारायण, श्री आकरी, श्री निराकारी. या दैवतांशिवाय श्री व्हडली वनदेवी, श्री धाकटी वनदेवी, श्री रवळनाथ श्री महालक्ष्मी आणि श्री भगवती. शिरोडें येथें हे देवस्थान असतांना प्रत्येक दैवताच्या देवस्थानास मालकी हक्काच्या बऱ्याच जमिनी होत्या. त्यात देवस्थानच्या स्थलांतरानंतर त्या जमिनी तेथें राहिल्या. अशा सर्व देवस्थानांच्या जमिनींचा व्यवस्थितपणें कायदेशीररित्या पंचनामा करण्यासाठीं तत्कालीन सरकारनें बारदेश तालुक्यांतील जमिनींची यादी ""तोंबु'' केला. त्यांत कांहीं उणीव किंवा कमतरता भासली म्हणून नव्यानें आणखी "तोंबु' करण्यासाठीं तत्कालीन व्हॉइसराय दों फिलीप मास्कारेंजस यानें व्हालेंति कुऱ्हेच नामक जज्जाची नेमणूक केली आणि त्याचा सेक्रेटरी म्हणून इस्क्रींव्हांव फ्रांसिस्कु लंकास्त्रि इस्तेव्हांव कुंग्ज मास्कारेंजस फ्रांसिस्कु रिबैरू या नांवाच्या इसमाची नेमणूक केली. त्यांनी ता. 13 मे 1647 रोजीं शिरोडें येथें जाऊन तेथील गांवकार, स्थानिक अधिकारी, त्या जमिनींत रहाणारे आणि देवस्थानाच्या जमिनींची सविस्तरपणें विस्तृत इत्थंभूत माहिती जाणणारे, या सर्वांस त्या धर्म चालीरिती वहिवाटी प्रमाणे रितसर सत्य तेंच सांगण्याची त्यांच्याकडून शपथ घेऊन त्या सर्व जमिनींचा पंचनामा केलेला आहे. या पंचनाम्यांत देवस्थानांच्या सर्व जमिनींची नोंद, त्या प्रत्येक जमिनींच्या चतु:सीमा, लांबी रूंदी तसेंच देवस्थानांच्या सेवेकऱ्यांस सेवा करून वेतन त्या जमिनींच्या उत्पन्नांतून प्रतिवर्षी घ्यावयाचें असतें त्या जमिनी, जमिनी भोगवटा करणारांनी देवस्थानास जें कांही प्रतिवर्षी देणेची जबाबदारी वगैरे सविस्तर माहिती संशोधन करणाऱ्यांस मिळू शकते. गोवा पुरातत्व खात्याच्या प्राचीन दप्तरात "फोराले दे बारदेस' या नांवाचें जाड हस्तलिखित आहे. त्या हस्तलिखित वहीया, पृष्ठ 1 ते पृष्ठ 25 पर्यंत, सेरूला गांवची माहिती आहे. सेरूला म्हणजे शिरोडं. त्या माहिती प्रारंभी ""तेऱ्हास दुस नामोशीस दुस पायोदिस'' असं शीर्षक आहे. ज्या जमिनी देवालयाच्या सेवेसाठी सेवेकरी याकडे ह्या भोगावट्यास ठेवण्यांत येई, त्या जमिनींस "नमशी' या नावाने संबोधित असत. त्या पंचनाम्यांत प्रत्येक दैवताच्या जमिनी नोंदलेल्या आहेत. त्यांत ""धाकटे वनदेवतेचें व्हांव'' ""व्हडल वनदेवतेचें व्हांव'' अशा नांवाच्या जमिनीही असून त्या तो पंचनामा करण्याच्या कालीं कोण कोण उपभोगीत होता' त्या ख्रिस्त धर्मीय इसमाचीं नांवेही त्यांत आहेत. त्या सर्व हस्तलिखितांतील लिखाण प्राचीन लिपी आणि भाषा पोर्तुगीजमध्यें आहे. श्री वेताळ देवस्थानच्या मालकी हक्काची एक जमीन तत्कालीन व्हॉइसरायानें हा 17 नवंबर 1566 च्या फर्मांनानें शिरोडें येथील नवख्रिस्ती इसमास इनाम दिल्याची माहिती मिळते, यावरून तें देवस्थान इ. सन 1566 पूर्वीं कांही वर्षें तरी स्थलांतर झालें होते. दों येंरिकि या पोर्तुगालच्या राजानें दों आसाव लेख म्हणजे दानपत्र ता. 30 ऑगस्ट 1580 रोजीं करून शिरोडें येथें असलेल्या श्री वेताळ देवस्थानच्या मालकी हक्काच्या जमिनीपैकीं एक शेत जमीन "मुळाआख' नांवाची बारदेश तालुक्यांतील रेईस मानुस (बारदेश-वेरें) येथील चर्चसाठीं दिल्याचीही माहिती मिळते.

श्री. मोहन मंजनाथ पंडीत यांच्या हस्ते आज दिनांक २९ फेब्रुवारी २०१२ रोजी सदर संकेतस्थळ (Website) अर्पण करण्यात येत आहे.

2012 - 24, All rights reserved, Vetal Maharudra Mulgaon Santhan, Goa, India.
Maintained by Infotools® , Pune   |   *Last updated on :   |   Add this Website to favorites !